logo

राजन विचारे तिसऱ्यांदा निवडणूक रिंगणात

शिवसेना ठाकरे गटाने जाहीर केलेल्या पहिल्या यादीत ठाणे लोकसभा मतदारसंघातून विद्यमान खासदार राजन विचारे यांना पुन्हा एकदा निवडणुकीच्या रिंगणात उतरवले आहे. विचारेंची ही लोकसभेची तिसरी निवडणूक आहे.
परंतु सध्याची राजकीय समीकरणे बदलली असल्याने त्यांना हॅट‌्ट्रिक साधता येणार का? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. दोन्ही निवडणुकीत विचारेंसमोर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा उमेदवार होता. आता मात्र राष्ट्रवादी (शरद पवार) गट आणि काँग्रेस हे पक्ष ठाकरे गटासोबत आहेत. त्यातच ठाकरे गटाने ठाण्यातून उमेदवार म्हणून विचारेंचे नाव जाहीर केल्याने आता शिंदे गटाला तुल्यबळ उमेदवार द्यावा लागणार आहे. शिंदे गटाकडून उमेदवाराची घोषणा झाल्यावर ठाण्यात ठाकरे विरुद्ध शिंदे गट अशी अटीतटीची लढत होईल हे निश्चित मानले जात आहे.

शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी ट्विट (७) करून ठाकरे गटाची पहिली यादी जाहीर केली. त्यामध्ये १६ जागांसाठी उमेदवारांची घोषणा करण्यात आली आहे. त्यात ठाणे लोकसभेसाठी विचारे यांचे नावे निश्चित झाले आहे. गुरुवारी २८ मार्च रोजी असलेल्या शिवजयंतीचे औचित्य साधून ठाण्याच्या मासुंदा तलाव येथील अश्वारूढ असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करत तसेच महाराजांचे आशीर्वाद घेत, विचारे यांनी प्रचाराच्या कामाला सुरू केली. यावेळी त्यांच्यासोबत इंडिया आघाडीतील काँग्रेस ठाणे जिल्हाध्यक्ष विक्रांत चव्हाण, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे ठाणे जिल्हाध्यक्ष सुहास देसाई आदी उपस्थित होते. याचदरम्यान, एकीकडे ठाकरे गटाने ठाणे लोकसभेचा उमेदवाराची घोषणा केली तरी सुद्धा दुसरीकडे शिंदे गटाला अद्यापही उमेदवार मिळत नाही. त्यामुळे विचारे यांनी मुख्यमंत्री शिंदे यांना डिवचण्याची संधी सोडली नाही.

शिवसेना फुटीनंतर शिवसेनेत दोन गट पडल्याने ठाणे जिल्ह्यातून आमदार आणि माजी नगरसेवक, पदाधिकारी तसेच कार्यकर्त्यांनी शिंदे गटात प्रवेश केला. पण, खासदार विचारे हे ठाकरे गटासोबत राहिले. त्यांचा राजकीय प्रवास नगरसेवक, महापौर, आमदार आणि खासदार असा झाला आहे. परंतु आता ठाणे हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा गड असल्याने ते हा गड राखण्यासाठी कोणाला उमेदवारी देतात. याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

पहिली सत्ता ज्या ठाण्याने शिवसेनेला दिली आणि या ठाण्यामध्ये बाळासाहेब ठाकरे यांनी बघितलेले स्वप्न पूर्ण होत असताना जी विकासकामे झाली, त्याच जोरावर ही निवडणूक लढविणार आहे. ही निवडणूक यासाठी प्रतिष्ठेची आहे की ज्या ठाण्यामधून पहिली गद्दारी झाली होती. तीच गद्दारी आता दुसऱ्यांदा झाली. ठाण्यात निष्ठावंत विरुद्ध गद्दार अशी लढाई होणार आहे. नक्कीच या सच्चाईला ठाणेकर, नवी मुंबईकर असेल या मीरा-भाईंदरकर या ठिकाणी मला साथ देतीलच. परंतु विरोधकांना अद्यापही उमेदवार मिळत नसेल तर मला वाटतंय त्यांनी मला बिनविरोध निवडून द्यावे.

- राजन विचारे, उबाठा

0
0 views